मुंबई – मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिले आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. राज ठाकरेंनी या संदर्भात पत्र लिहून कार्यकर्त्याना आवाहन केले आहे. यामध्ये मराठी भाषा गौरव दिवस जेवढा भव्य करता येईल तेवढा करा. असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियाच्या अधिकृत अकांऊट्सवरून ‘मराठी भाषा गौरव दिवस’ साजरा करण्यासंदर्भात एक पत्रक जारी करण्यात आले आहे. त्या पत्रात राज ठाकरे म्हणताहेत की, २७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. ‘गौरव दिवस’ पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता; परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत आपण, आपल्या पक्षाने सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा. यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की, तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचे पावित्र्य राखा. संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा, अशीही माहिती मनसेने आपल्या पत्रकात लिहिली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने आता मनसे तयारीला लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मनसैनिकांच्या उपस्थितीत यांनी नेरूळ, घणसोली, नेरूळ परिसरातील मनसेच्या नवीन शाखांचे उद्घाटन केले.