लोहमार्ग पोलिसांचे नियोजन
मुंबई : ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे दर्शन घेण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी येण्याचा अंदाज लोहमार्ग पोलिसांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे दादर स्थानकात उपनगरीय रेल्वे प्रवासी, मेल-एक्स्प्रेस प्रवाशी आणि आलेल्या अनुयायांची मोठी गर्दी होऊ शकते. ही गर्दी टाळण्यासाठी तसेच याचे योग्य नियोजन करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून ६ डिसेंबरला मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक सहावरील सर्व प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या वृत्तांसुर, दादर पूर्वेकडून फलाट क्रमांक ६ मधील कोणत्याही प्रवेशद्वारातून प्रवाशांना प्रवेश करता येणार नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. तसेच प्रवेशद्वारच बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मधल्या मोठ्या पुलाचाही वापर करता येणार नाही. ६ क्रमांकाच्या फलाटातून प्रवेशास मनाई असल्याने प्रवाशांना थेट हिंदमाता येथील महानगरपालिकेच्या पुलाचा वापर करून सहा क्रमांकाच्या फलाटात येऊन सीएसएमटीला जाणाऱ्या जलद लोकल पकडता येणार आहेत. मधला मोठा पादचारी पूल केवळ लोकल आणि मेल एक्स्प्रेसने स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्व-पश्चिममेकडे शहर हद्दीत जाण्याकरिता तसेच दादर मध्य रेल्वेवरील एका फलाटातून पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या फलाटात जाण्याकरिता खुला राहणार आहे.