संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर तब्बल 5 हजार 664 हरकती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. 1 ते 14 फेब्रुवारी या मुदतीत 5 हजार 664 हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी आणि प्रभाग क्रमांक 8 भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग या दोन प्रभागावर सर्वाधिक हरकती आल्या आहेत. व्याप्तीबाबतच्या सर्वाधिक हरकती असून विद्यमान नगरसेवकांनीही हरकती घेतल्या आहेत. महापालिका इतिहासातील यावळेच्या प्रभाग रचनेवरील सर्वाधिक हरकती आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.

भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक पाच च-होली सर्वांत मोठा तर प्रभाग क्रमांक सात सॅण्डविक कॉलनी, रामनगर सर्वांत छोटा प्रभाग असणार आहे. महापालिका प्रशासनाने 1 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेवर हरकती मागविल्या आहेत. पहिल्या आठवड्यात हरकतींचे प्रमाण कमी होते. मागील आठवड्यात आणि आज शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला. प्रभाग क्रमांक 5 व 8 या दोन प्रभागांवर सर्वाधिक हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चर्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, बुर्डेवस्ती व ताजणेमळा या भागाचा समावेश आहे. हा प्रभाग नैसर्गिकरित्या झाला नाही. यामधील गजाननगर, भारतनगर, गणेशनगर, आदर्शनगर, भारतमातानगर, कृष्णानगर हा भाग प्रभाग क्रमांक सात किंवा आठला जोडण्याची मागणी केली. यासाठी 700 हरकती आल्या आहे. मात्र हे अर्ज अवघ्या दोन व्यक्तींनी आणून दिले असल्याचे प्रशासनाने सांगितले. तर, प्रभाग क्रमांक आठ साठी देखील मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या आहेत. यामध्ये भोसरी गावठाण, गवळीनगर, खंडोबामाळ व शितलबाग आदींचा समावेश आहे. त्यातील गव्हाणे वस्ती भाग अखंड ठेवावा अशी मागणी केली आहे. यासाठी दोनशेहून अधिक अर्ज आले आहेत. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 3 (जाधववाडी, बोर्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक 11(गवळीमाथा, बालाजीनगर), 14 (यमुनानगर, फुलेनगर), 17 (वल्लभनगर, संततुकारामनगर), 20 (काळभोरनगर, अजंठानगर), 36 (डांगे चौक, गणेशनगर), 37 (ताथवडे, पुनावळे), 41 (पिंपळे गुरव गावठाण) आणि 42 (कासारवाडी, फुगेवाडी) या प्रभागांवर हरकती आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami