औरंगाबाद- महाराष्ट्रात सध्या महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. त्यात आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भर पडली आहे. जाधव यांनी महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात आपले शेत विकून स्वाभिमान यात्रा काढण्याची घोषणा केली आहे.
येत्या १२ तारखेपासून काढण्यात येणाऱ्या स्वाभीमान यात्रेतून छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे आपण सांगणार आहोत.या यात्रेत सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील जाधव यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. भाजपचे नेते हे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या विरोधात सातत्याने बदनामीकारक बोलत आहेत, ते चुकून नाही तर ठरवून, एका षडयंत्राचा तो भाग असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
जाधव म्हणाले, कोणी म्हणतो महाराजांनी माफी मागितली, कोणी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली. हे सगळ सुरू असतांना आपण मात्र गप्प बसलेलो आहोत. यावर कोणी काही बोलायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधक देखील मुग गिळून बसले आहेत. ईडी, सीबीआयच्या भितीमुळे ते बोलत नाहीत. पण मला ईडी, सीबीआयची भिती नाही, कारण मी या राजकीय नेत्यांसारखी संपत्ती कमावून ठेवलेली नाही.असेही त्यांनी सांगितले