पुणे – नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूनने गुरुवारी विदर्भाच्या बहुतांश भागात प्रगती करत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. परंतु गेल्या तीन वर्षांपासून महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. आतापर्यंत (१५ जून) गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तब्बल ३६ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरचे नागरिक आणि नद्या पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. पावसाने अशीच दडी मारल्यास येथील शेतकऱ्यांवर दोबार पेरणीचे संकट ओढावणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही दरवर्षीइतका पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष पावसाकडे आहे. दरम्यान, केरळमध्ये वेळेआधी पोहोचून ३१ मेपर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मान्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बहुतांश कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला. तर, १३ जून रोजी मान्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांपर्यंत मजल मारली. तर, आज मान्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत विदर्भाच्या बहुतांश भागात पोहोचला.