सातारा- गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने सातारा जिल्ह्यातील असंख्य गावांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल 1580 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. शासनाच्या तोडक्या यंत्रणेमुळे आजही असंख्य गावांना मदत मिळाली नाही. परंतु सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि नाम फाऊंडेशनच्या यांच्या सहकार्याने महाबळेश्वर तालूक्यातील शेतीच्या पुनर्बांधणी कामासाठी विशेष मोहीम हाती घेतलीआहे.
त्यासाठी तब्बल 66 जेसीबी, 6 पोकलेन, चार डंपर आणि तीन ट्रॅक्टर महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.आता संपुर्ण यंत्रणा तालुक्यात गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरु करणार आहेत.ही मोहिम सुमारे 15 दिवस सुरु राहणार असून या यंत्रणेसाठी डीपीडीसीमधून डिझेलची सोय करण्यात आली आहे.साधारण जुन जुलै महिन्यात या भागात भात लागवडीसाठी लगबग सुरु होते आणि या शेतकर्यांना स्वत:च्या शेतात भात शेती करता यावी या करीता त्यांना शेत तयार करुन देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.