क्राइस्टचर्च – महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२२ चे सामने ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये ६ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. त्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज मोठा निर्णय जाहीर केला. एखाद्या संघातील खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यास तो संघ ९ खेळाडूंसोबत सामने खेळू शकतो. म्हणजे ९ खेळाडूंच्या संघाला आयसीसीने परवानगी दिली आहे. या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे.
न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. येथील ६ ठिकाणी या स्पर्धेतील क्रिकेट सामने होणार आहेत. ३ एप्रिलपर्यंत ही क्रिकेट स्पर्धा आहे. रॉबिनहूड पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीने यावेळी नवीन नियम केला आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन तो केला असल्याचे आयसीसीचे हेड ऑफ इव्हेंट क्रिस टेटली यांनी सांगितले. त्यानुसार एखाद्या संघातील खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले तर ते ९ खेळाडूंच्या संघासह स्पर्धेत खेळू शकतात. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हा बदल केला आहे. मात्र अजूनही १५ खेळाडू अधिकृतपणे संघात ठेवण्याची मुभा आहे, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या संघाला १.३२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स बक्षीस दिले जाणार आहे. ते गेल्यावेळच्या बक्षिसाच्या दुप्पट आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ पुढीलप्रमाणेः- मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मांधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.