पुणे- वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्याविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना पुणे पोलिसांनी अटक केली. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणी ही काल रात्री पुण्यातील एस बी रोड वरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी वाहनाला तिने हॉर्न दिला. हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या वकील महिलेचा विनयभंग केला. तसेच तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी ओरबडले. इरकल यांच्यासोबत असलेल्या इतर २ जणांनी त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या प्रकारावरून पुणे पोलिसांना धारेवर धरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.