नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता यासिन मलिकने तिहार तुरुंगात सुरू केलेले उपोषण अखेर १० दिवसांनी मागे घेतले. आपल्या मागण्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी आपण उपोषण समाप्त केले, असे मलिकने सांगितले.
तिहार तुरुंगात असलेल्या यासीन मलिकने आपल्या विरुद्धचा तपास योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप केला होता. याच्या विरोधात त्याने २२ जुलैपासून तुरुंगातच उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्याची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले. परंतु तो आपल्या निर्णयावर ठाम होता. उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याने केलेल्या मागण्यांचे निवेदन संबंधित तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती तुरुंग महासंचालकांनी मलिकला दिली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी मलिकने उपोषण मागे घेतले. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.