नागपूर – जिल्ह्यातील माजी शिक्षक आमदार, महापौर आणि शिक्षक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल सोले यांना मिळालेले विविध पुरस्कार, सन्मानचिन्ह यांचा कचरा झाला असून फुटपाथवर असलेल्या एका भंगाराच्या दुकानात हे सर्व पुरस्कार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. नागपूरमधील रामदासपेठ येथे असलेल्या फुटपाथवर ही दृश्ये पाहून विविध चर्चांना उधाण आले आहे.
अनिल सोले यांना त्यांच्या कामगिरीसाठी विविध संस्था आणि संघटनांनी सन्मानचिन्ह,स्मृतिचिन्ह विविध भेटवस्तू देत त्यांचा सत्कार केला आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून या सर्व वस्तू भंगाराच्या दुकानात होत्या.त्या दुकानदाराला या वस्तू कोणत्या व्यक्तीच्या आहेत याची काहीच कल्पना नव्हती.त्यामुळे त्याने अनेक सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह अवघ्या ५० ते १०० रुपयांना विकली.ही बाब अनिल सोलेंच्या समर्थकांना समजताच त्यांनी उर्वरीत वस्तू तेथून ताब्यात घेतल्या.
यामध्ये अनिल सोले आमदार असताना त्यांना गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेले सन्मानचिन्ह,माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह, शहीदस्मृती दिनाच्या कार्यक्रमातील सन्मानचिन्ह,भारत माता छायाचित्राचे स्मृतीचिन्ह, विदर्भ हिंदी साहित्य संघाचा प्रेरणापुंज सन्मान असे अनेक नामवंत सन्मानचिन्ह भंगाराच्या दुकानात होते.
फुटपाथवरील भंगाराच्या दुकानात हे पुरस्कार आल्याचे पाहून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे पुरस्कार इथे कसे आले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. अशात सोलेंचे स्वीय सहाय्यक विजय फडणवीस आणि ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सरांच्या कार्यालाचे स्थलांतर सुरू असताना सर्व सामान वेगवेगळ्या पोत्यात भरून ठेवले होते.त्यात एक भंगारात द्यायचे सामान भरलेले पोते देखील होते. गडबडीत एका कर्मचाऱ्याने सरांचे पुस्कारांचे पोते भंगारात दिले असावे त्यामुळे हा गोंधळ झाला. कारण आम्ही देखील काही दिवसांपासून त्यांच्या पूरस्कारांचे पोते शोधत होतो.शेवटी ते रामदासपेठच्या फुटपाथवरील दुकानात सापडले.