गाझियाबाद – भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना यांचे आज रविवारी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते.गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्रिलोक चंद रैना हे भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील रैनावरी आहे. १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर रैनाच्या वडिलांनी गाव सोडले होते. यानंतर त्रिलोक चंद रैना गाझियाबादमधील मुरादनगर येथे आले.त्यांना दोन मुले दिनेश आणि सुरेश आणि दोन मुली आहेत. सुरेश रैनाने ३ एप्रिल २०१५ रोजी प्रियंकासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काश्मिरी पंडित त्रिलोकचंद रैना यांनी आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. रैनाचे वडील ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करायचे.सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्याच्यासोबतच रैनाही निवृत्त झाला. रैनाने भारतासाठी १८ कसोटी,२२६ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त एकूण ७८ टी-२० सामने खेळले आहेत.