पुणे : – माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज शुक्रवारी पुण्यात निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. यामुळे त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९:३० वाजता उपचारादरम्यान शेखावत यांचे निधन झाले. सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्याला होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शेखावत यांना १९७२ मध्ये मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. शेखावत हे विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे माजी महापौर होते. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून १९८५-१९९० या कालावधीसाठी निवडून आले होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य देखील होते.