संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

माथेरानचा प्रवास सुकर होणार १५ ऑक्टोंबरपूर्वी ई-रिक्षा धावणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

माथेरान – भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला. त्यानंतर आता एमएमआर आणि आरटीओने प्रायोगिक तत्त्वावर ७ ई-रिक्षा १५ ऑक्टोंबरपूर्वी सुरू करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहेत. यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुकर होणार आहे. याशिवाय हातरिक्षा चालकांची अमानुष प्रथेतून मुक्तता होऊन त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे.
माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे १० वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा करत होते. शेवटी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर १२ मे रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर सरकारने ई-रिक्षा सक्षमपणे सुरू करण्यासाठी अभ्यासाची गरज असल्याचे सांगून या पायलट प्रोजेक्टसाठी ३ महिन्यांची मुदत मागितली होती. ती न्यायालयाने दिली होती. त्यानुसार माथेरान येथे वाहनबंदी असल्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन सचिवांनी ७ ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची माथेरान नगरपालिकेला परवानगी दिली. १५ ऑक्टोबरपूर्वी ही रिक्षा सुरू करण्यास सांगितले आहे. त्यामुळे माथेरानला भेट देणाऱ्या आजारी आणि जेष्ठ पर्यटकांसह इतरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. याशिवाय हात रिक्षाच्या अमानवी प्रथेतून रिक्षाचालकांची सुटका होणार आहे. ई-रिक्षामुळे हात रिक्षाचालकांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळेल, असे श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami