माथेरान – माथेरान नगरपरिषद निवडणूक पुढील दोन महिन्यांत साधारणपणे मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत.यावेळी आघाडी आणि युतीचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल दिसत आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. राज्यात सर्वत्र ही स्थिती असताना माथेरानमध्ये मात्र शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहीजण शिंदे गटात गेले आहेत.पण आता हे सगळेच नगरपरिषद निवडणुकीत मात्र एकत्र दिसण्याची शक्यता आहे. यात दोन्ही पक्षातील निष्ठावंत मात्र द्विधा मनस्थितीत दिसण्याची शक्यता आहे.