मुंबई: राज्यात यंदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात असताना, राज्यात मान्सूनची चाहूल लागत आहे. राज्यातील कोकण आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून पुढच्या दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा पाऊस १०६ टक्के पडणार आहे. तसेच उर्वरित भागात ९९ टक्क्यांपर्यंत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगावमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या स्थितीचा प्रभाव अनुकूल राहिल्याने मान्सूनच्या आगमनाला कोणताही अडथळा नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात पोहोचणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाचा मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी करण्यात आला आहे. पण स्कायमेटने भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले असले तरी आयएमडीने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे.