नवी दिल्ली :- केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर गव्हाच्या दरात किलोमागे पाच रुपयांपर्यंतची घट झाली. आता त्यात आणखी घसरण होणार आहे. नुकतीच केंद्र सरकारने गव्हाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३० लाख मेट्रिक टन गहू बाजारात आणण्याची घोषणा केली होती. त्यांनतर आता मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत २५ लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
भारतीय अन्न महामंडळाकडे गहू विक्रीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. एफसीआय देशातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गव्हाच्या विक्रीवर लक्ष ठेवेल. एफसीआयने मार्चअखेर २५ लाख टन गहू विक्रीकरण्याची योजना आखली. त्याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट केंद्र सरकारने तयार केली. देशांतर्गत गहू आणि पिठाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी व्यापारी, राज्य सरकारे आणि सहकारी संस्था, महासंघ, सार्वजनिक क्षेत्र या उपक्रमाद्वारे गव्हाची विक्री केली जाईल. केंद्र सरकारने आतापर्यंत दोन फेऱ्यांमध्ये गव्हाचा लिलाव केला. यामध्ये १२.९८ लाख मेट्रिक टन गहू विक्री करण्यात आला. केंद्र सरकारकडून सध्या ११.७२ लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी सोडण्यात येईल. मार्चपर्यंत हा सर्व गहू विक्री केला जाईल.