मुंबई : मालाडला पश्चिमेकडील जनकल्याण नगर येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मरीना इंक्लेव्ह या 21 मजली इमारतीला आज सकाळी 11 वाजता लेवल 1 ची आग लागली.घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सर्व रहिवासी सुरक्षित असून या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मरीना इंक्लेव्ह या बहुमजली इमारतीतील बहुतांश फ्लॅटमध्ये अनेक कुटुंब राहतात. आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून तेथील लोकांमध्ये घबराट पसरली होती. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले.आगीचे मोठमोठे लोट खिडकीतून बाहेर येताना दिसत होते.ज्या फ्लॅटमध्ये आग लागली तेथील रहिवासीही पूर्णपणे सुरक्षित आहेत. या आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणीने खिडकीतून खाली उडी मारून आपला जीव वाचवला आहे.दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नसून घटनेचा तपास सुरु आहे.