बंगळुरू – ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तो पाहून त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. कारण यात मिथुन रुग्णालयाच्या खाटेवर झोपलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा समोर येऊ लागल्या होत्या. मात्र अखेर त्यांचे पुत्र मिमोह चक्रवर्ती यांनी सोशल मीडियावरून वडिलांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली.
मिमोह चक्रवर्ती यांनी सांगितले, ‘मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्हायरल झालेला फोटो हा रुग्णालयातीलच आहे, ज्यामध्ये ते बेशुद्धावस्थेत बेडवर झोपलेले आहेत. मात्र त्यांची तब्येत आता ठीक आहे. बंगळुरूतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, मात्र आता डिस्चार्ज मिळाला आहे’, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हे ऐकून मिथुन यांच्या लाखो चाहत्यांना हायसे वाटले. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.