भाईंदर – अनेक अवास्तव नियमबाह्य कामांवर झालेल्या कोट्यवधींच्या उधळपट्टीमुळे आणि डोक्यावरील करोडोंच्या बोजामुळे मिरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे.यामुळे आता पुढील खर्च भागवण्यासाठी पालिकेवर बँकेत असलेल्या ६० कोटींच्या मुदत ठेवी
मोडण्याची नामुष्की ओढवली आहे.
अग्निसुरक्षा आणि निवृत्ती वेतनासाठी असलेल्या बचत ठेवीमधून प्रत्येकी ३० कोटीप्रमाणे एकूण ६० कोटी रुपयांच्या ठेवी मागच्या जानेवारी महिन्यात मोडल्या आहेत.या पालिकेने अनेक कामांच्या निमित्ताने कर्जे घेतली आहेत. एमएमआरडीएकडून घेतलेल्या कर्जाचा तर वर्षाला सुमारे ६० कोटी रुपयांचा हप्ता भरावा लागतो. तर अलीकडे काँक्रिटच्या रस्त्यासाठी ५०० कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. त्याचा हप्ता तर ८५ कोटींच्या घरात आहे. आतापर्यंत असलेल्या १९२ कोटींच्या या बचत ठेवी प्रत्यक्ष मोडण्याची वेळ आली नव्हती.मात्र कोरोना काळातील खर्चामुळे २०२१ मध्ये मुदत ठेवींवर ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला होता. प्रामुख्याने टेंडर आणि टक्केवारीतून या स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्टाचाराचे कुरण बनले असल्याचा आरोप होत आहे.नगरसेवक आणि त्यांच्या नेत्यांकडून स्वेच्छानिधीच्या नावाखाली करोडो रुपयांवर कब्जा मिळवला जात असल्याचे बोलले जात आहे.