मुंबई- मलेशियाच्या क्वालालांपूर येथे १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ‘मिस आणि मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल २०२२’ ही २ गटांत आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या मिस गटात भारताचे प्रतिनिधित्व कुमारी हर्षा विनोद शिंदे तर मिसेस गटाचे प्रतिनिधित्व गौरी अशोक थोरात करणार आहेत. विशेष म्हणजे त्या दोघी पुण्याच्या आहेत. या स्पर्धेत जवळपास ३० देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत.
आपापल्या देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचे आपल्या वेशभूषेतून प्रदर्शन करण्यासाठी जागतिक स्तरावर मिस आणि मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान मलेशियाच्या क्वालालांपूरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पुण्यातील मृणाल इंटरटेनमेंटच्या संचालिका आणि नॅशनल डायरेक्टर मृणाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची टीम त्याची जय्यत तयारी करत आहे. इंटरनॅशनल हेरिटेज स्पर्धेत भारताबरोबरच रशिया, नेपाळ, चीन, जपान, थायलंड, युक्रेन, टांझानिया, न्यूझीलंड, सिंगापूर अशा जवळपास ३० देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत.