मुंबई – दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक संघाने घेतला आहे. त्यामुळे तबेल्यातील ताज्या दुधासाठी मुंबईकरांना आता ३.५ रुपये प्रति लिटर जादा मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात ७५ रुपये लिटरच्या वर जाणार आहे. जनावरांची देखभाल, मजुरी, चारा आणि औषधे महागल्यामुळे ही दरवाढ करावी लागली, असे संघटनेचे अध्यक्ष सी. के. सिंह यांनी सांगितले.
महागाई गगनाला भिडली आहे. औषधे, चारा महागला आहे. महागाईचा दर १० ते १२ टक्क्यांनी वाढला आहे. असे असताना आम्ही केवळ ५ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीत बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपये आणि वाहतुकीत ५० पैसे अशी एकंदर ३.५ रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्यावर्षी १ एप्रिलला २ रुपयांची दूध दरवाढ केली होती. याचा परिणाम दुग्धजन्य खाद्यपदार्थांसह मिठाईवरही होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत किरकोळ बाजारात दुधाचा दर ७२ ते ८० रुपये आहे. तो या दरवाढीमुळे ७५ ते ८४ रुपयांवर जाणार आहे. मुंबईला दररोज सुमारे ७ लाख लिटर ताज्या दुधाचा पुरवठा केला जातो. अशा ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.