मुंबई – मुंबईत जून महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे तलाव क्षेत्रात अपुरा जलसाठा होता. त्यामुळे पाणी कपात करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले होते. मात्र जुलै महिन्यापासून समाधानकारक पर्जन्यसृष्टी झाल्यामुळे महानगरपालिकेतर्फे लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
सन २०२२च्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपुरा जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यसृष्टीत सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेने २७ जूनपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, जलाशय, भातसा, विहार, तुळशी, मोडकसागर आणि तानसा या मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका जलसाठा असावा लागतो. आज ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ दशलक्ष इतका जलसाठा उपलब्ध आहे.