संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

मुंबईतील बेस्टची जमीन विकण्याचा
भाजप आमदार कोळंबकरांचा प्रस्ताव !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या ७५ एकर निवासी संकुल जागेतील १५ एकर जमिन सध्या राहत असलेल्या बेस्ट कर्मचार्‍यांना बाजारभावाने देऊन उर्वरित जागा विकून टाकावी. त्यामुळे बेस्टचा आर्थिक फायदा होऊन कर्मचार्‍यांनाही ते लाभदायी ठरेल अशा मागणीची लक्षवेधी सुचना भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधानपरिषदेत केली.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बेस्ट उपक्रमाबाबत काही महत्वपूर्ण माहिती सभागृहात दिली.यावेळी बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या नावे सध्या राहत असलेली सदनिका करता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी लक्षवेधी सूचना मांडताना म्हटले की, मुंबईत बेस्ट उपक्रमाची ३५० एकर उद्योग संकुल आणि ७५ एकर निवासी जागा आहे.त्यापैकी निवासी संकुलाच्या १२ एकर जमिनीवर वसाहतीची जागा शासकीय भावाने विकून ५०० स्क्वेअर फुटांची घरे त्या वसाहतीत राहत असलेल्या बेस्ट कर्मचार्‍यांना बाजारभावाने द्यावेत आणि अन्य जागा विकून टाकावी. त्यामुळे बेस्ट कर्मचारी आणि बेस्ट प्रशासन असा दोघांचाही फायदा होऊ शकेल.पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर म्हणाले की, वीज ग्राहक व बस सेवा देणार्‍या बेस्ट कर्मचाऱ्यांचे निवासस्थान कामाच्या ठिकाणापासून जवळ असणे गरजेचे आहे.त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची सदनिका दुसर्‍या नियुक्त कर्मचार्‍याला मिळणे गरजेचे आहे.त्यामुळे संबंधित सदनिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या नावे करणे शक्य होणार नाही. दरम्यान,सध्या बेस्ट उपक्रमात ३६०० बसेस असून मुंबई आणि उपनगरासह ठाणे,नवी मुंबई ,मीरा भाईंदर आदी परिसरातील सुमारे १ कोटी ६० लाख लोकांना त्याचा प्रवासासाठी लाभ घेता येतो. तर बेस्टमध्ये २९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. बेस्टची सेवा देशभरात अप्रतिम स्वरूपाची आहे. पण गेल्या काही वर्षांपासून बेस्ट तोट्यात चालत आहेत ही वस्तुस्थिती असून तिला आर्थिक मदतीची गरज आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या