मुंबई – मुंबईतील मच्छिमार आणि कोळी बांधवांच्या कडव्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोस्टल रोड प्रश्नी अखेर आंदोलनकर्त्यांना मोठे यश मिळाले आहे. सातत्याने केलेला पाठपुरावा आणि प्रकल्पातील जाचक अटींच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकल्पाची राज्यभरात चर्चा झाली होती. अखेरीस कोस्टल रोड बाधितांनी खांबांमधील अंतराच्या संदर्भात केलेल्या मागणीला प्रशासनाने मान्यता दिली असून याबाबत सोमवारी निर्णय देखील घेण्यात आला आहे. दरम्यान,आता या प्रकल्पातील ७ ते ९ या दोन खांबांमधील अंतर आंदोलकांच्या मागणीनुसार १२० मीटर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे,अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मतय्या स्वामी यांनी दिली आहे.
प्रमुख अभियंता मतय्या स्वामी यांनी सांगितले की,या प्रकल्पात एकूण ११ खांब उभारले जाणार असून आतापर्यंत ५ खांबांचे काम पूर्ण झाले आहे. तर ७ पासून पुढे होणार्या खांबांच्या कामांत ७ ते ९ या दोन खांबांमधील अंतर वाढवून १२० मीटर केले जाणार आहे.दरम्यान या निर्णयामुळे सातत्याने लढा देणाऱ्या प्रकल्प बाधितांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.प्रकल्पबाधित असलेल्या कोळी समाजाने सुरुवातीपासूनच बोटींचा अपघात टाळण्यासाठी कोस्टल प्रकल्पात बांधल्या जाणाऱ्या या खांबांपैकी २ खांबांमधील अंतर हे १२० मीटर असावे अशी मागणी लावून धरली होती.या मागणीबाबत ऑक्टोबर महिन्यात समिती स्थापन करण्यात आली होती. गोवा येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी सदस्य तसेच मच्छिमार बांधवांचे प्रतिनिधी या समितीत होते.
वास्तविकता,आतापर्यंत मुंबई पालिका आणि राज्य सरकारने सकारात्मक भूमिका न घेता हे अंतर ६० मीटर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला होता.अखेरीस प्रकल्पबाधितांच्या पाठपुराव्याला यश आले असून सोमवारी झालेल्या बैठकीत दोन खांबांमधील अंतर हे १२० मीटर ठेवण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.दोन खांबांमधील अंतराची मागणी मान्य करण्यात आली असली तरी अद्याप इतर बाबींची स्पष्टता होणे बाकी आहे.