मुंबई : मुंबई परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४५० परदेशी नागरिकांची देशातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाने ही कारवाई केली आहे. यामध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिक आफ्रिका खंडातील असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच धक्कादायक म्हणजे भारतात राहता यावे म्हणून हे नागरिक छोटी मोठे गुन्हे करतात. म्हणजे जोपर्यंत हे खटले निकाली लागत नाही तोपर्यंत ते भारतात वास्तव्य करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी देशभरात असे ७९८ नायजेरिया व आफ्रिकी देशातील नागरिकांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. अथात भारतात आलेले जास्तीत जास्त हे परदेशी नागरिक भारतात राहण्यासाठी गुन्हे करून इथेच राहण्याची पळवाट शोधतात. विशेषतः परदेशी नागरिक भारतात आल्यावर त्याची कोणतीही माहिती परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाला देणे बंधनकारक असतानांही तो देत नाही. हे नागरिक भारतात बेकायदा राहण्यासाठी हे अर्ज भरून नोंदणी करत नाहीत. यासाठी अर्ज न भरता भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध एफआरआरओच्या मदतीने भारतीय गुप्तहेर यंत्रणेच्या मदतीने विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेत बेकायदा राहाणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाते. तसेच, अशा बेकायकदा परेदशी नागरिकांना काळ्या यादीत टाकले जाते. जेणेकरून अशा प्रवाशांना पुन्हा भारतात प्रवास करता येत नसल्याचीही माहिती अधिकाऱ्याने दिली.