मुंबई – मुंबईकरांसाठी पाणीकपातीबाबत एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवार आणि बुधवार पाणीकपात करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद होणार आहे. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मंगळवार २९ नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पवई आणि वेरावली दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पाणी गळती रोखण्यासह इतर कामांचाही समावेश आहे. पवईतील ३०० मिमी पाइपलाइन तसेच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या १८०० मिमी पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा २४ तास बंद करण्यात येणार आहे.
मुंबईतील के-पश्चिम या प्रभागातील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद असणार आहे. के-पूर्व, एच-पश्चिम, एच-पूर्व, पी-दक्षिण, एस, एल आणि एन या प्रभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नसल्याने के पश्चिम वॉर्डात राहणार्या सुमारे ७.५ लाख लोकांना २४ तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा वाढवण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने वेरावली ते घाटकोपर दरम्यान, ६.६ किलोमीटरचा बोगदा बांधला जात आहे. त्यामुळे ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू यासारख्या ठिकाणी २४ तास पाणी पुरवठा बंद असणार आहे. या प्रभागात असणाऱ्या महापालिकेच्या कूपर रुग्णालयासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. के-पूर्व भागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आदी ठिकाणांचा समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात २९ नोव्हेंबर रोजी पाणीकपात होणार आहे. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात ३० नोव्हेंबरला, तर के-पूर्व, जी-उत्तर, पी-दक्षिण या प्रभागात पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, हा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. एच-पश्चिम प्रभागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्यात येणार आहे. तर,३० नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.