मुंबई – पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने मुंबई महापालिकेच्या 7 तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. त्यामुळे पाणी कपात लागू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 8 दिवसांत जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या 7 धरणांतील पाणीसाठा वेगाने आटत असून सातही धरणात मिळून सध्या केवळ 9.76 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. पावसाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे अखेर पाणी कपातीच्या निर्णयाची चर्चा जल अभियंता विभागात सुरू झाली आहे. मात्र पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. येत्या काही दिवसात पाऊस पडला तरी धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय होऊन प्रत्यक्ष पाणीसाठा वाढण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत 9 टक्के पाणीसाठा अपुरा पडू शकतो. त्यामुळे किमान 10 टक्के पाणी कपात किंवा पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केली जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठ दिवसात जलसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
