मुंबई – कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. बुधवार 2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक पालिकेकडून जारी करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमाच्या नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल. परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल. कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल, असेही पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे. तसेच विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांची उपस्थिती 100 टक्के असणे आवश्यक आहे, असेही पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.