मुंबई – मुंबई महापालिकेतर्फे पवई आणि वेरावली तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती व जोडकाम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी मुंबईच्या तब्बल १२ प्रभागातील काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.पश्चिम उपनगरातील रहिवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.त्यामुळे या भागातील रहिवाशांनी गरजेपुरता पाणीसाठा करून ठेवावा व काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
महापालिकेतर्फे पवई जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम,तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या इनलेट जोडणीसाठी मंगळवार सकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व-पश्चिम,बांद्रा,पूर्व-पश्चिम,भांडुप,कुर्ला,घाटकोपर, खार पश्चिम,सांताक्रूझ पश्चिम, मालाड पूर्व-पश्चिम,दक्षिण विभाग,वरळी आदी भागात २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.तर काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. बांद्रा पश्चिम भागात याकाळात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.तर सांताक्रूझ पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होणार आहे.