मुंबई – गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील थंडी पळून गेली असून अचानक तीव्र उन्हाने डोके वर काढले.
मुंबईकरांना फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या चार दिवसांतील ३६ अंश तापमानाने काल गुरुवारी अचानक उसळी मारली आणि हे तापमान ३७.५ अंशांपर्यंत पोहचले.पुढील दोन दिवसांत आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईत दुपारी तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.पूर्वेकडील वाहणार्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात हा बदल जाणवू लागला आहे.पुढील दोन दिवसांत आणखी दोन अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल गुरुवारी किमान तापमान १८.२ अंश होते. उद्या शनिवार आणि परवा रविवारी तापमान वाढणार आहे.मुंबईत या महिन्यात साधारण कमाल तापमान ३० अंश असते. पण हेच तापमान ७ ते ८ अंशांनी वाढले आहे.काल किमान तापमान सांताक्रूझ-१८.२, कमाल-३७.५,आर्द्रता – ४९ टक्के आणि कुलाबा किमान तापमान २१.२,कमाल- ३६.४ आर्द्रता ५२ टक्के नोंदली गेली.कालच्या तापमानाने या महिन्यातील रेकॉर्ड तोडले आहे.
गेल्या महिन्यात कमाल तापमान ३४.८ डिग्री सेल्सिअस इतके होते.