संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

मुंबई पालिकेचा ४५ हजार ९४९ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; मालमत्ता करात सूट पण वापरकर्ता शुक्ल आकारणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या अर्थ संकल्पकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. कारण येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वूमीवर सत्ताधारी शिवसेनेकडून आकर्षक अर्थसंकल्प सादर होण्याची अपेक्षा होती. आणि त्याचप्रमाणे गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबई पालिकेने १७ टक्क्यांनी अर्थसंकल्प वाढवला आहे. यामध्ये सर्वांना पाणी योजना, शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यंदाचा 45 हजार 949 कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज सकाळी सव्वा अकरा वाजता पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला.  यात शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. सन 2022-2023 चा 45 हजार 949.21 कोटींचा आणि 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी भरीव तरतूद

शिवसेनेकडून मुंबईकरांना मोफत पाण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुलुंड वांद्रे पश्चिम भागातील प्रायोगिक प्रकल्पच बंद पडला होता. आता मात्र पुन्हा एकदा मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून सर्वासाठी पाणी ही योजना राबवण्यात येणार आहे.

५०० चौ. फू. पर्यंत मालमत्ता कर माफ

मुंबई महापालिकेतील निवडणुकीचे बिगुल वाजताच मुंबईत ५०० चौ. फू. पर्यंतच्या घरांना करमाफी देण्यात आली होती. आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे १६ लाख १४ हजार नागरिकांना फायदा होणार असून पालिकेला ४६४ कोटींचा भुर्दंड बसणार आहे.

बेस्टला अर्थसहाय्य

बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्यापोटी 800 कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर गोरेगाव-मुलुंड लिंकरोड साठी 1300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कचरा निर्मिती करण्याऱ्या आस्थापनांना शुल्क

मालमत्ता कर माफ केल्याने तूट भरून काढण्यासाठी पालिकेने वापरकर्ता शुल्क लागू करण्याचे ठरवले आहे. कचरा निर्मिती करणाऱ्यांकडून वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार आहे. या वापरकर्ता शुल्कातून वर्षाला 174 कोटी रुपये मिळण्याचं टार्गेट महापालिकेने ठेवलं आहे. मुंबईतील 3500 उपहारगृहांनाही आता कचऱ्या निर्मिती केल्यास वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. या सर्व उपहारगृहातून येणाऱ्या 300 टन ओल्या कचऱ्यावर महापालिकेला 26 कोटींचं वापरकर्ता शुल्क मिळणार आहे,

200 आरोग्य केंद्र

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आरोग्यावर भरीव 2660 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबईत 200 हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवयोग केंद्र आता मुंबईत असणार आहे. केंद्राच्या या योजनेचं शिवसेनेने नामकरण करून ही योजना मुंबईत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने मुंबईत 200 शिवयोग केंद्र स्थापन केली जाणार आहेत. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकांना दुप्पट दंड

महापालिकेच्या तिजोरीला गळती लागल्याने महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने नवीन मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत बांधकामांना ज्यादा दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास मालमत्ता कराच्या दोन पट दंड आकारणी करण्यात येणार आहे. उत्पन्नवाढीसाठी मुंबईत डिजीटल जाहिरातींच्या माध्यमांना परवानगी दिली जाणार आहे. यातून अतिरीक्त उत्पन्न मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami