मुंबई : रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० फेब्रवारी रोजी होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी सोलापूर स्थानकातून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ दुपारी तीन वाजता मुंबईसाठी रवाना होईल. या एक्स्प्रेसचे भाडे सुमारे ५०० ते १००० रुपये अधिक असणार आहे.
या एक्स्प्रेसचे मुंबई- पुण्याचे भाडे (कॅटरिंग चार्जेस वगळून) चेअर कारसाठी ५६० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी १,१३५ रुपये. सीसी सीटसाठी ९६५ रुपये आणि ईसी सीटसाठी १,९७० रुपये असणार आहे. तर सोलापूर,नाशिक मार्गासाठी ५५० रुपये तिकीट असणार आहे. सीसी आणि ईसीसाठी १,१५० रुपये भाडे तिकीट आहे. साईनगर-शिर्डी साठी ८०० रुपये आणि सीसी आणि ईसी साठी १,६३० रुपये दर असणार आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी ६:५० वाजता सुटेल. पुण्यात सकाळी ९ वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता ती मुंबईहून निघेल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल. रात्री १०:४० वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. ही एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.
या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात. तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे. एकूण ११२८ इतकी प्रवासी क्षमता आहे.