मुंबई- मुंबई विमानतळावर 40 कोटीचे 8 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हेरॉईनची तस्करी करणार्या झिम्बावेतील दांपत्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी दिली. रोनाल्ड माकुं बे (56) आणि त्याची पत्नी माकुं बे लव्हनेस (52) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी दांपत्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई विमानतळावर अदिस अबाबाहून आलेल्या दांपत्याला रोखण्यात आले. अदिस अबाबा हे अवैध ड्रग्जचे ट्रान्झिट हब मानले जाते. या दांपत्याला त्यांच्याजवळ काही संशयास्पद आहे का? असे विचारण्यात आले. यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता तरकीरी पावडर आढळून आली. या पावडरची तपासणी केल्यावर अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर दांपत्याने केपटाऊनमधून ड्रग्ज आणल्याची कबुली दिली. हे ड्रग्ज भारतात नेण्यासाठी शेरॉन नावाच्या महिलेने त्यांना भारताच्या फ्लाईट तिकीटांसह प्रतिबंधित वस्तू दिल्या होत्या. तसेच त्यांना 500 अमेरिकन डॉलर्सही देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते, अशी माहिती अधिकार्यांनी दिली