कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या शासकीय निवासस्थानात काल रात्री एक अज्ञात व्यक्ती घुसल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी घुसखोरी करणार्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती ममता बॅनर्जी यांच्या शासकीय निवासस्थानात घुसला होता. हा अज्ञात व्यक्ती आज सकाळी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ झोपलेला आढळून आला. या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा अत्यंत कडक असते. अशा परिस्थितीत कोणी सुरक्षा व्यवस्था तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आत जात असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत कडेकोट बंदोबस्त असतानाही एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या निवासस्थानात कशी घुसली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.