गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र पाठवले आहे. शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे केली.ही कामे न करण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून दिली जात आहे.याआधी एकनाथ शिंदे यांनाही नक्षवाद्यांकडून धमकीचे पत्र आले होते.
शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॉ. राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून कार्यरत आहेत. शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून गेठे यांच्यावर होती.मात्र या कामांना गडचिरोलीत विरोध सुरू आहे. सुरजागडच्या खाणकामालाही विरोध केला जात आहे. हा स्थानिक स्तरावर असला तरी इथे खदानीच्या कामाला नक्षलींचाही विरोध आहे. त्यामुळे इथे कामबंद होते पण आता परत कामाची हालचाल सुरू झाली आहे. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. राहुल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांना टार्गेट करत जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवले.एकनाथ शिंदे यांचे अधिकारी गेठे यांच्यामुळे आमचे खूप नुकसान होत आहे. आम्ही लवकरच आमच्या मृत भावांचा बदला घेणार आहोत,असेही पत्रात म्हटले आहे.