मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून प्रवास करतात तिथला पोलीस बंदोबस्त कमी करून कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना शिंदे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल असतो. ज्या मार्गावरून मुख्यमंत्री प्रवास करतात त्या मार्गिकेवरील सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर करडी नजर ठेवत पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. मोठ्या संख्येने पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.