कोल्हापूर:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कणेरी मठ भेट दिली. कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. याप्रसंगी काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कणेरी मठातील सर्व उपक्रम आदर्शवत असे आहेत. येथे आदर्श गावाची संकल्पना मांडण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या सहभागातून कलस्टर शेती केली जाणार आहे. सेंद्रीय खते वापरून पिके घेतली जाणार आहेत. त्यामुळे विषमुक्त शेतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. जैविक शेतीतून उत्पन्न कमी मिळते, हा गैरसमज येथे दूर केला आहे. या शेतीतून उत्पन्नही मोठे मिळते, व फायदाही मिळतो. येथे देशी गायीची गोशाळा आहे. गायींच्या शेण, मुत्रापासून विविध उत्पादने घेतली जात आहेत. शेणापासून पेंटही तयार केला जात आहे. गावातील लोकांना आवश्यक वस्तुंचे उत्पादन येथेच घेतले जाणार आहे. येथील लोकांची गरज भागवून त्याची विक्री केली जाणार आहे.
पंचमहाभूत लोकोत्सवाचा आरंभ महाशिवरात्रीच्या दिवशी १९ फेब्रुवारी ला होणार आहे. या दिवशी कोल्हापूरमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पर्यावरणासंबंधित चित्ररथ पाहणे या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यात पंचमहाभूत तत्त्वावर पाच स्वतंत्र दालने असतील. आकाश, वायू, जल, पृथ्वी आणि अग्नी या पाच तत्वांवर आधारित या दालनाची मांडणी आहे.