मुंबई:- मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे. जे. रुग्णालयात रमेश केरे यांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी केरे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
या घटनेनेनंतर रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ज्यांनी ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीची तक्रार यावेळी आशा केरे यांनी केली आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात आठ जणांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बदनामी करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, असे आरोप केरे पाटील यांनी तक्रारीत केले आहेत. दरम्यान, रमेश केरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कथित ऑडिओ क्लिप ही 3 वर्षांपूर्वी झालेल्या फोन संभाषणाची आहे. या क्लिपमध्ये आर्थिक व्यवहारांचा उल्लेख आहे. मात्र, ही ऑडिओ क्लिपची मोडतोड केलेली आहे, असा आरोप रमेश केरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.