अकोला: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी अकोला येथून संवाद यात्रा सुरू केली. याप्रसंगी त्यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अकोल्याच्या बाळापूर येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मी माझा आमदारकीचा राजीनामा देत आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह ४० आमदारांनी त्यांचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकांना समोरे जावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे आज अकोला दौऱ्यावर होते. यावेळी राज्यातील सरकार घटनाबाह्य असून ते सरकार काही महिन्यात कोसळणार असून लवकरच निवडणुका लागणार आहे असा दावा त्यांनी केला. तुम्ही निवडणुकीसाठी तयार आहात ना ? अशी हाक उपस्थित कार्यकर्त्यांना दिली होती. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटातून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांचे कौतुक करत शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांनी बंडखोर आमदारांचा पुन्हा एकदा गद्दार म्हणून उल्लेख केला आहे.
या सभेमध्ये त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार केवळ दुसऱ्यांची खिल्ली उडवतात. त्यांना तेवढेच येते. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी सरकारकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. राज्यात कृषिमंत्री कोण आहे? हे देखील शेतकऱ्यांना माहिती नाही. दरम्यान अकोल्यातील बाळापूरमध्ये पोहोचले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आदित्य यांचे जल्लोषात स्वागत केले होते.