नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. १५ मे रोजी ते आपला कार्यभार सांभाळणार आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे. सुशील चंद्रा यांची जागा ते घेतील, असे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ पोटकलम २ नुसार राष्ट्रपतींनी राजीव कुमार यांची १५ मेपासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सुशील चंद्रा यांचा शनिवारी कार्यकाल पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. १ सप्टेंबर २०२० मध्ये त्यांची निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून ते निवडणूक आयुक्त म्हणून काम करत आहेत. आता त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.