ठाणे- मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावाच्या हद्दीत काल बुधवारी सकाळी ओढ्याच्या बाजूला एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याची माहिती मृतदेहाच्या विच्छेदन अहवालानंतर समजू शकेल, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील यांनी दिली.
कोरावळे गावात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी तेथे कामाला गेलेल्या कामगारांना काहीतरी कुजल्याचा वास येऊ लागला.नागरिकांनी परिसरात शोध घेतला असता ओढ्याच्या बाजूला बिबट्या मृत आढळला. नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही घटना सांगितली.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदन करण्यासाठी मुरबाड येथे आणला. मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तो पाठवण्यात येणार आहे. कोरावळे गावाच्या परिसरात आठ दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले होते.त्यानुसार वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्येही बिबट्या चित्रित झाला होता. मुरबाड तालुक्याचा ५० टक्के भाग हा अभयारण्याशी जोडला गेला आहे. त्यातील भीमाशंकर,माळशेज घाट, आजोबा पर्वत,गोरखगड जंगल तसेच बारवी धरण जंगल भागात वाघ आणि बिबट्याचा वावर दिसून येतो.