सुदैवाने ४० पर्यटक बचावले
पणजी- गोवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून मंदावला असला तरी काल शुक्रवारी दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील साखळी,डिचोली,सत्तरी भागात जोरदार पाऊस झाला.या पावसाने कुळे, दूधसागर नदी आणि धबधब्याच्या पाणी पातळीतही वेगाने वाढल्याने परिसरातील ओहोळात घातलेला लोखंडी साकव अचानक कोसळला.यावेळी पर्यटनासाठी आलेले ४० हून अधिक पर्यटक अडकले होते.मात्र ‘दृष्टी” च्या जीवरक्षकांनी त्यांची सुखरूप सुटका केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल मोले महाविर अभयाअरण्यात गडगडाटसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे कुळे दुधसागर नदीत तसेच परिसरातील ओहोळात पाणी अचानक वाढल्याने ओहळातील लोखंडी साकव पाण्याच्या प्रवाहात पलटी झाला. त्यामुळे ट्रेकींग व धबधबा पाहण्यासाठी गेलेले ४० पर्यटक ओहोळाच्या पलीकडे काहीवेळ अडकले होते.’दृष्टी “च्या जीवरक्षकांना याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी धाव घेत सर्वांना पाण्यातुन बाहेर काढले आहे. यावेळी जिवरक्षक निरज गांवकर,हनुमंत भजंत्री,मारुती ओटावडेकर,विठ्ठल मसुरकर व शनवाज नदाफ यांनी या सर्वांना सुखरुप बाहेर आणण्यास मदत केली. दरम्यान,गेल्या काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात याच भागातील ओहोळातून ट्रेकिंगला जाताना एक मुलगी वाहून गेली होती. कित्येक दिवस तिचा शोध लागला नव्हता.शेवटी पाणी ओसरल्यावर तिचा मृतदेह हाती लागला होता.