मेघालयात काँग्रेसला मोठा दणका; माजी मुख्यमंत्र्यांसह १२ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

शिलाँग – मेघालयात काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. मेघालयमधील चक्क १२ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्थातच तृणमुल काँग्रेसच पारड तर जडं झालं आहे. मात्र काँग्रेसचं मोठ नुकसान झालं आहे. या १२ आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता मेघालयात काँग्रेसमध्ये १८ पैकी केवळ ६ आमदार राहिले आहेत.

देशात भाजपसमोर स्वतःला सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता काँग्रेसला जबरदस्त दणका दिला आहे. मेघालयमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह १२ आमदारांचा पक्षात समावेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून मुकुल संगमा हे पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. व्हिन्सेंट एच.पाला यांना मेघालय काँग्रेस कमिटीचे प्रमुख बनवल्यावरून ही नाराजी होती. त्यानंतर महिन्याभरातच मुकुल संगम यांनी १२ आमदारांना सोबत घेत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी मुकुल संगम नाराज असल्याचं समजताच त्यांची आणि व्हिन्सेंट एच. पाला यांची भेट घेऊन समजुत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा फारसा काही फरक पडला नसल्याचं दिसून येत आहे.

राज्यात काँग्रेसचे १८ आमदार होते, त्यापैकी आता फक्त ६ आमदार शिल्लक आहेत. मेघालयात अचानक घडलेल्या या घटनेनंतर आता टीएमसी निवडणूक न लढवता तिथला सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. तृणमुल सध्या पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त मेघालयच नाही तर इतरही राज्यात तृणमुलने काँग्रेस नेते आपल्याकडे वळवून घेतल्याचं सांगण्यात येतंय.

गोव्यामधून काँग्रेस नेते लुइझन फ्लुरिओ यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणातही तिच परिस्थिती पहायला मिळाली आहे. हरियाणातून काँग्रेस नेते अशोक तंवर यांनी देखील तृणमुलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, एकंदरीतच तृणमुलच्या पक्षविस्ताराच्या प्रयत्नाला यश मिळताना दिसत आहे. सध्या १२ आमदारांच्या प्रवेशामुळे तृणमुल हा राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन तृतीयांश संख्याबळाची पूर्तता केली असल्याने पक्षबदलानंतरही या आमदारांच्या आमदारकीला कोणतीही भीती राहणार नाही. त्यामुळे एकंदरीतच तृणमुल काँग्रेस सध्या काँग्रेसवर हावी होताना दिसत आहे. पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याचे मानले जात आहे. पक्ष विस्ताराच्या माध्यमातून ममता बॅनर्जी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसऐवजी भाजपची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी असणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami