मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी मेट्रो एजी कॅश अँड कॅरी बिझनेस कंपनी खरेदी करणार असून खरेदी करार जवळपास निश्चित झाला आहे. रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिनी 28 डिसेंबर रोजी रिलायन्स या कंपनीचे अधिग्रहण करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही कंपनी खरेदी केल्यानंतर रिलायन्स रिटेलची डीमार्ट आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.
ही मेट्रो कंपनी खरेदी झाल्यानंतर 31 स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात येणार असून या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टि ब्रॅण्ड रिटेल चेन तयार केली जाणार आहे. मेट्रोची भारतातील 31 घाऊक वितरण केंद्र, लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची होतील. मेट्रोची भारतातील 31 घाऊक वितरण केंद्रे आणि लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची असतील. मेट्रोचा वार्षिक महसूल एक अब्ज डॉलरच्या घरात आहे. रिलायन्स उद्योग समूहाकडून रिटेल क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. बिग बाजारसोबत त्यांनी करार केला. रिटेल क्षेत्रात उतरण्याच्या दृष्टीने रिलायन्सकडून एफएमसीजी सेक्टरमधील काही छोट्या कंपन्यादेखील खरेदी करण्यात येत आहेत. कॅम्पाकोला ही जुनी शीतपेय कंपनीदेखील रिलायन्सने खरेदी केली आहे.