मुंबई – मुंबई मेट्रो २ अ आणि ७ मार्गावर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.मेट्रो २ अ व मेट्रो ७ मार्गावर मेट्रोच्या फेरीच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.
दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेच्या सेवा वेळेत वाढ करण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे. त्यानुसार आज मंगळवारपासून आता शेवटची गाडी रात्री १०.०९ ऐवजी रात्री १०.३० ला सुटणार आहे.मुंबई मेट्रो २ अ मार्गावर अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्वदरम्यान दोन फेऱ्या वाढणार आहेत. एक रात्री २२.२० वाजता आणि एक रात्री २२.३० वाजता अशा या दोन वाढीव फेऱ्या असतील.गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्वदरम्यानही दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री २२.२० आणि २२.३० या वेळेत या वाढीव फेऱ्या होतील. एमएमएमओपीएलच्या निर्णयानुसार मंगळवारपासून या अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत.या वाढीव फेऱ्या पुढील दोन महिन्यासाठी असतील.