अमरावती- अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे 3 जणांना जीव गमाववा लागला. तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. याची घटनेची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत अमरावतीच्या जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला. मृतांच्या नातेवाईक मदतीचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
मेळघाटात दूषित पाण्याने तिघांचा मृत्यू तर 70 ते 80 जणांची प्रकृती बिघडली. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरीमध्ये दूषित पाणी पिल्याने कॉलरा सदृश्य आजारामुळे साथ आली आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तिथं पोहोचल्या. यावेळी नवनीत राणांसह जिल्हा परिषदचे सीईओ, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकार्यांसह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी हजर होते. नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, गावात अतिशय भीषण परिस्थिती आहे, गावाबाहेरच्या विहिरीतील घाण पाणी पिल्याने लोकं आजारी पडले आहेत. त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील पाणीपुरवठा करणार्या टाकीचा वीज पुरवठा कापल्याने ही परिस्थिती ओढवली. मागील सरकारने आदेश दिल्याने वीज पुरवठा 15 दिवस आधी कापण्यात आला. ज्या विभागाच्या चुकीमुळे ही घटना घडली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.