संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

मॉक ड्रिलवेळी जखमी झालेल्या अग्निशमन जवान कर्वे यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गेल्या महिन्यात माटुंगा पूर्वेकडील भाऊ दाजी रस्त्यावर मॉक ड्रिलदरम्यान झालेल्या विचित्र अपघातात मुंबई अग्निशमन दलाचे तीन जवान गंभीर जखमी झाले होते. शनिवारी माटुंग्यातील भाऊ दाजी रोडवरील श्रीनिधी अपार्टमेन्टमध्ये मॉक ड्रिल सुरु होते.यावेळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमध्ये चेंगरून गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी गंभीर जखमी झालेले जवान सदाशिव धोंडिबा कर्वे यांचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले.त्यानंतर काल भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कर्वे यांना मानवंदना देण्यात आली.

मुंबईकरांच्या कोणत्याही नैसर्गिक संकटात मदतीला धावून येणार्‍या अग्निशमन दलातील जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अग्निशमन दलात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा मुख्यालयात काल कर्वे यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच मुंबईकरांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अग्निशमन दलाच्या वतीने या जवानाला मानवंदना देण्यात आली.त्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब तसेच अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या अपघातात सदाशिव कार्वे यांना पाय गमवावा लागला होता. त्यांच्यावर पालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत.दरम्यान,मुंबई अग्निशमन दलातील हलगर्जी प्रशासनामुळे जवानाचा मृत्यू झाला असून या घटनेला प्रशासन जबाबदार आहे. अग्निशमन दलासाठी निकृष्ट दर्जाच्या गाडय़ा खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami