*आरक्षण रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई – दादरच्या फाळके रोड येथील मुंबई महापालिकेचा दोन हजार चौरस फुटांचा भूखंड खेळाचे मैदान म्हणून राखीव होता; मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे
हा भूखंड बिल्डरच्या ताब्यात गेल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. आगामी काळात या भूखंडाचे आरक्षण बदलले जाण्याची शक्यता असल्याने हा भूखंड पुन्हा ताब्यात घ्यावा,अशी मागणीही राजा यांनी केली आहे.
दादर येथील दादासाहेब फाळके रोडवर मोक्याच्या जागेवरील हा भूखंड खेळाचे मैदान म्हणून राखीव होता. त्याचे बाजारमूल्य साधारण १५० कोटींच्या घरात आहे. पालिकेला १५० कोटी रुपये खर्च करून तो ताब्यात घ्यायचा होता.त्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भूखंड ताब्यात घेणे अपेक्षित होते; मात्र पालिकेने गेल्या ८ ते १० वर्षांत तो ताब्यात घेतलेला नाही.पालिकेने भूखंड ताब्यात घेतला नसल्याने न्यायालयाने भूखंडावरील आरक्षण बदलावे,असे आदेश दिले आहेत.
पालिकेने खरेदी नोटीस देऊनही हा भूखंड ताब्यात घेतला नसल्याने बिल्डरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या भूखंडावरील खेळाचे मैदान म्हणून असलेले आरक्षण बदलावे, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा भूखंड बिल्डरच्या ताब्यात गेला आहे.यामुळे हा भूखंड पुन्हा ताब्यात घेऊन खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करावे आणि दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे लक्ष वेधणार असल्याचे राजा यांनी सांगितले.