नवी दिल्ली – केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. यामध्ये प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजनेमार्फत गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असतात. आता प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजनेचे पैसे काढण्यासाठी ‘स्पाइस मनी’ या मोबाईल ऍपचा वापर करता येणार आहे.
या योजनेंतर्गत एका वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. या योजनेचा लाभ १० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांना आता या योजनेतील पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. प्रत्येक वर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये म्हणजेच प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये त्याचे वाटप करते. आता हे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. ‘स्पाइस मनी’ या मोबाईल ऍपद्वारे शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एईपीएसद्वारे घरापर्यंत अनुदानाची रक्कम काढून देण्यास मदत होणार आहे. बँकेत जाण्याची गरज नाही. यासाठी स्पाइस मनीचे अधिकारी क्युआर कोडच्या माध्यमातून तुमच्या खात्यामधील पैसे ते तुम्हाला रोख स्वरुपात देतील. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे.