नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटसाठी चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून परिधान केलेल्या या विशेष जॅकेटमुळे चर्चेत आले आहेत. या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. विशेषतः हे जॅकेट परिधान करुन मोदींनी आज थेट संसदेत हजेरी लावली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत पोहोचले. मात्र पीएम मोदींच्या या पेहरावाची बरीच चर्चा होत असल्याचे पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या या निळ्या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहेत. हे जॅकेट विशेष ब्रँड किंवा विशेष डिझायनरमुळे चर्चेत नाही. तर यासाठी वापरण्यात आलेला कपडा जास्त महत्त्वाचा आहे. ज्या प्लास्टिकच्या बाटल्या पाणी पिऊन फेकून दिल्या जातात, त्याच प्लास्टिकपासून या जॅकेटचा कपडा तयार करण्यात आला आहे.